शेतकरी आंदोलनामुळे मध्य प्रदेशमधील बिघडलेली परिस्थिती सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आजपासून उपोषणाला बसले आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित होईपर्यंत उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. चौहान हे भोपाळमधील दसरा मैदानात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. चौहान यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दसरा मैदानावर पोहोचले आहेत. मंचावर चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थितीत आहेत.

उपोषणावर बसवण्यापूर्वी चौहान यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्याप्रती संवदेनशील असल्याचे म्हटले. काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलांच्या हातात दगडे दिली जात आहेत. जेव्हा सरकार चर्चेस तयार नसते, तेव्हाच आंदोलन केले जावे. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी म्हटले. शेतकऱ्यांना योग्य भाव देणे हे निश्चित केले जाईल. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या दलालांना नष्ट केले जाईल. केंद्र सरकारच्या धर्तीवर पिकांची खरेदी केली जाईल. आमच्या सरकारचे लक्ष्य हे राज्य आणि राज्यातील जनतेचा विकास करणे हे आहे, असेही ते म्हणाले.