मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारातच ५ शेतकरी मारले गेले, अशी कबुली राज्याचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी दिली आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी गोळीबारात ५ शेतकऱ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. आता खुद्द गृहमंत्र्यांनीच कबुली दिल्याने शिवराजसिंह चौहान सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारातच ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चौकशीनंतर ही बाब स्पष्ट झाल्याची माहिती गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी माध्यमांना दिली. विशेष म्हणजे, घटनेनंतर खुद्द गृहराज्यमंत्री सिंह यांच्यासह राज्य सरकारही समाजकंटकांनी आंदोलनादरम्यान गोळीबार केल्याचा दावा करत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे याआधी बुधवारीही मध्य प्रदेश पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची कबुली दिली होती. पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊसकर यांनीही बुधवारी आंदोलकांवर पोलिसांनीच गोळीबार केल्याचे मान्य केले होते. चौकशीनंतर ही बाब स्पष्ट झाली होती. पण ज्या परिस्थितीत गोळीबार करावा लागला होता, ते सांगणे कठिण आहे, असेही ते म्हणाले होते. चौकशी पूर्ण झाली नसल्याने किती पोलीस बळाचा वापर केला होता, याबाबत सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, राज्य सरकारने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर आज, गुरुवारी जिल्हाधिकारी स्वतंत्र कुमार सिंह आणि पोलीस अधीक्षक ओ. पी. त्रिपाठी यांना पदावरून हटवण्यात आले आहे.