पेट्रोलच्या दरांमध्ये सलग दहाव्या दिवशी दरवाढ करण्यात आल्यानंतर, राजस्थानच्या पाठोपाठ मध्य प्रदेशातही पेट्रोलने गुरुवारी शंभरी गाठली. पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरला ३४ पैसे, तर डिझेलच्या दरांत लिटरमागे ३२ पैशांची वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

जादा कर लागू होणारे ब्रँडेड पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान यांसारख्या राज्यांत १०० रुपयांपलीकडे पोहोचले असले, तरी राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरात पेट्रोलने ही पातळी बुधवारी गाठली आणि गुरुवारी मध्य प्रदेशातही त्याने हा टप्पा गाठला. मध्य प्रदेशच्या अनुपपूर शहरात पेट्रोलचे लिटरमागे १००.२५ रुपये, तर डिझेलचे दर लिटर ९०.३५ रुपये इतके झाले.

मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्क यांनुसार इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये लागू केला जातो व त्यामागोमाग मध्य प्रदेशचा क्रमांक आहे. मध्य प्रदेशात पेट्रोलवर लिटरमागे ३३ टक्के अधिक ४.५ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार असून, डिझेलवर प्रति लिटर २३ टक्के अधिक ३ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार लावला जातो.

गुरुवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ९६.३२ रुपये, तर दिल्लीत ८९.८८ रुपये इतके झाले आहेत. डिझेलचे दर मुंबई व दिल्लीत अनुक्रमे ८७.३२ रुपये व ८०.२७ रुपये इतके झाले आहेत.

पेट्रोलियम निर्यातक देशांची संघटना (ओपेक) आणि रशियासह त्यांचे सहयोगी देश मिळून होणारा ‘ओपेक प्लस’ हा गट यांच्यात झालेल्या करारानुसार सौदी अरेबियाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात तेलाचे उत्पादन दररोज १ दशलक्ष बॅरेलने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सतत वाढत आहेत. यामुळे तेलाच्या किमती बॅरलमागे ६३ अमेरिकी डॉलपर्यंत चढल्या आहेत. यामुळेच इंधनाचे दर भडकले आहेत.