14 October 2019

News Flash

योगी-मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपपुढे महाआघाडीचे आव्हान

२०१४ मध्ये पूर्वाचलमधील १३ जागांपैकी १२ जागा भाजपनेजिंकल्या होत्या.

समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांच्या महाआघाडीने उत्तर प्रदेशात भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.

महेश सरलष्कर, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील पूर्वाचल राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे! पूर्वाचलमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला गेलेला गोरखपूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश होतो. २०१४ मध्ये पूर्वाचलमधील १३ जागांपैकी १२ जागा भाजपनेजिंकल्या होत्या. एक जागा भाजपचा मित्रपक्ष अपना दलाला मिळाली होती.

मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात १९ मे रोजी पूर्वाचलमध्ये मतदान होणार आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर गोरखपूरमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रवीण निषाद विजयी झाले होते. या वेळी पूर्वाचलमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीने भाजपला तगडे आव्हान दिले आहे. वाराणसी वगळता उर्वरित १२ मतदारसंघांत भाजपला विजय मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही. निषाद, कुर्मी, आदी बिगरयादव तसेच, कुशवाहा राजभर, सैंथवार या जातीतील मतदार सप-बसप आघाडीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता मानली जाते. मुस्लीम मतदार उमेदवार पाहून आघाडी वा काँग्रेसला मतदान करतील असा अंदाज आहे. पूर्वाचलमधील बहुतांश मतदारसंघांत भाजप आणि काँग्रेसने उच्चवर्णीय उमेदवार उभे केले असल्याने उच्चवर्णीय विशेषत ब्राह्मण मतांची विभागणी भाजपसाठी त्रासदायक ठरू शकेल, असाही मतप्रवाह आहे.

गोरखपूर आणि वाराणसी या दोन लोकसभा मतदारसंघांकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या वेळीप्रमाणे यंदाही तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून दणदणीत विजय प्राप्त करतील असा दावा वाराणसीतील भाजप कार्यालयातील पदाधिकारी करतात. या मतदारसंघात मुस्लीम आणि त्याखालोखाल ब्राह्मण मतदार सर्वाधिक आहेत. अपना दल पक्षाचा मूळ मतदार असलेला कुर्मी हा ओबीसी मतदार मोठय़ा संख्येने आहे. वाराणसीमध्ये भाजप, सप आणि काँग्रेस अशी त्रिकोणी लढत असली तरी विरोधकांचे उमेदवार कुमकुवत असल्याचे मानले जाते. मोदींना ब्राह्मणांसह इतर उच्चवर्णीय, वैश्य, खत्री, कुर्मी या मतदारांचा पाठिंबा आहे. सपने शालिनी यादव तर, काँग्रेसने अजय राय यांना मैदानात उतरवले आहे.

योगी आदित्यनाथ यांच्यासमोर गोरखनाथ वाचवण्याचे आव्हान आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या प्रवीण निषाद यांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा ब्राह्मण उमेदवार पराभूत झाला होता. या वेळीही गोरखनाथमध्ये भोजपुरी सिनेमातील अभिनेता रवी किशन या ब्राह्मण उमेदवाराला भाजपने रिंगणात उतरवले आहे. बाहेरचा उमेदवार दिल्याने गोरखपूरवासी नाराज असल्याचे मानले जाते. या मतदारसंघात निषाद हा बिगरयादव ओबीसी मतदार सुमारे चार लाख असून त्यांची मते निर्णायक ठरतात. गोरखपूरमध्ये सपने निषाद उमेदवार दिला असून निषाद, यादव, दलित आणि मुस्लीम मतदार सप-बसप आघाडीला मतदान करण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवाय, काँग्रेसने दिलेल्या ब्राह्मण उमेदवारामुळे भाजपची ही मते विभागली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे गोरखपूरमध्ये योगींची कसोटी असून इथे सप-बसप आघाडीचा जोर असल्याचे दिसते.

First Published on May 16, 2019 4:05 am

Web Title: mahagathbandhan big challenge for yogi and narendra modi constituency