महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या दोन दुर्मिळ पत्रांचा मुंबईतील विवांता बाय ताज हॉटेलमध्ये लिलाव करण्यात आला. यातील एक पत्र महात्मा गांधी यांनी स्वत: लिहिले आहे, तर दुसऱया पत्रावर त्यांची स्वाक्षरी आहे. ही दोन्ही पत्रे अनुक्रमे ११.५ आणि ९ लाख रुपयांना लिलाव करण्यात आली.
सुरुवातीला या दुर्मिळ पत्रांचा १ ते २ लाख रुपयांपर्यंत लिलाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. गुजराती भाषेत ही पत्रे असून त्यात महात्मा गांधींची शिकवण वाचायला मिळते. महात्मा गांधी यांनी आपल्या नात्यातील एका तरुणाला वर्धा येथून १० ऑगस्ट १९३५ साली हे पत्र लिहीले होते.
गांधींनी पत्रात लिहीले आहे की, “आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करत रहा. इतर लोक काय सल्ला देतात हा धर्म नाही. धर्म म्हणजे, स्वत:चे मनात ज्या गोष्टीबद्दल विश्वास असतो. दुसरे कोणी तुमच्या मनातील कसे काय ओळखू शकते? त्यामुळे इतरांवर विश्वास न ठेवता, आपला रस्ता ओळखण्यात मदत व्हावी एवढीच पार्थना देवाकडे करा. तोच खरा मार्गदर्शक आहे.”
दुसरे पत्र गांधीजींच्या एका सहकाऱयाने ५ ऑक्टोबर १९३५ साली लिहीलेले आहे. हे पत्र देखील गुजराती भाषेत असून यावर महात्मा गांधींची स्वाक्षरी आहे.