भारतीय संशोधिका महुआ चौधरी यांचे संशोधन
एचआयव्ही व एड्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात कंडोमचा वापर वाढणे गरजेचे आहे. त्यातच आता भारतीय वंशाच्या अमेरिकी प्राध्यापकाने लॅटेक्सचा नसलेला पण अँटीऑक्सिडंट असलेला कंडोम तयार केला आहे. कंडोम फुटला व त्यातून एड्स विषाणू घुसले तरी ते यामुळे मारले जातात. श्रीमती महुआ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी टेक्सास ए अँड एम विद्यापीठात हे संशोधन केले आहे. हा कंडोम रबरी पदार्थाचा नसून तो लवचीक पॉलिमर म्हणजे हायड्रोजेलचा केलेला आहे. त्यात वनस्पतीतील अँटीऑक्सिडंट वापरले असून ते एचआयव्ही विषाणूला मारतात.
टेक्सास ए अँड एम आरोग्य केंद्राच्या इरमा लेरमा रँगेल औषधनिर्माण महाविद्यालयात श्रीमती चौधरी या सहायक प्राध्यापक आहेत. चौधरी यांनी सांगितले, की आम्ही एक नवीन पदार्थ कंडोमसाठी तयार केला आहे असे नाही तर एड्स विषाणूंना मारण्याची युक्तीही शोधून काढली आहे. त्यामुळे एड्सला आळा बसणार आहे. हा सुपरकंडोम एचआयव्ही विरोधात नक्कीच फायद्याचा असून त्यामुळे अकारण गर्भधारणाही टळणार आहे व लैंगिक संबंधातून रोग पसरण्याला आळा बसणार आहे. चौधरी यांनी भारतात असताना रेणवीय जीवशास्त्र व जैवभौतिकशास्त्र तसेच जनुकशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्या अमेरिकेत गेल्यानंतर पीएचडी झाल्या. तेथे त्यांनी लठ्ठपणा व मधुमेहावरही संशोधन केले आहे. त्यांना बिल व मेिलडा गेट्स फाउंडेशनचे ‘ग्रँड चँलेंज इन ग्लोबल हेल्थ’ या मोहिमेत संशोधनासाठी अनुदान मिळाले आहे. सध्या जगात असुरक्षित लैंगिक संबंधांनी ३.५ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण होते आहे. त्यामुळे हा कंडोम मोठय़ा प्रमाणात उत्पादन करता आला तर मोठा फायदा होणार आहे. त्याच्या चाचण्या सहा महिन्यांत होणार असून पेटंट अर्ज मंजुरीसाठी गेला आहे. ग्रामीण भागातही हा कंडोम व्यावसायिक पातळीवर उपलब्ध करून दिला जाईल, असे चौधरी यांनी सांगितले. १९८१ पासून एड्सने ३.९ कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे.