वादग्रस्त मुस्लिम प्रचारक झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही अशी आडमुठी भूमिका आता मलेशिया सरकारने घेतल्याचे समोर आले आहे. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला आहे. चिथावणीखोर भाषणांद्वारे मुस्लिम तरूणांना दहशतवादाकडे वळवल्याचा, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करून देण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. गुरुवारपर्यंत समोर आलेल्या महितीनुसार भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीवर मलेशिया सरकार विचाराधीन आहे अशी माहिती समोर आली होती. मात्र आज मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाला नकार दिला आहे असे समजते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

झाकीर नाईकमुळे कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रश्नच निर्माण होत नाही असे मलेशियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. कुआलालंपूरबाहेर असलेल्या पुतराज्या या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

झाकीर नाईक या मुस्लिम धर्मप्रचारकाने २०१६ मध्येच भारत सोडला आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल झाला होता. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवरही गंभीर आरोप होते. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करण्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणानंतर झाकीर नाईक दुबईत गेला. पुढे मलेशियात वास्तव्य करू लागला. मात्र त्याला भारतात पाठवणे शक्य नसल्याची आडमुठी भूमिका आता मलेशिया सरकारने घेतली आहे.