नवी दिल्ली : मालदीवमध्ये भारताने तैनात केलेली दोन हेलिकॉप्टर आणि साधारण ५० सैनिक मागे घेण्याची सूचना हिंदी महासागरातील या देशाने भारताला केली आहे.

भारताने मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि त्यांच्या वैमानिकांसह ५० सैनिक तैनात केले आहेत. अत्यवस्थ रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामी त्यांचा वापर होत होता. मात्र आता त्यासाठी मालदीवने स्वत:च्या सोयीसुविधा विकसित केल्या असून भारताच्या हेलिकॉप्टर आणि सैनिकांची गरज उरलेली नाही. तेव्हा भारताने ही हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घ्यावेत, अशी विनंती मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी भारत सरकारला केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या व्हिसाच्या मुदत संपली असून आता त्यांनी भारतात परतावे, असे मालदीवचे म्हणणे आहे.

आजवर भारताने मालदीवला लष्करी आणि नागरी मदत केली आहे. मात्र आता मालदीवमधील भारताच्या प्रभावाला चीनने आव्हान देण्यास सुरुवात केली असून तेथे मोठी गुंतवणूक केली आहे. मालदीवचे सध्याचे अध्यक्ष अब्दुल्ला यमीन हे चीनच्या बाजूने झुकलेले आहेत. त्यांच्या विरोधकांनी भारताकडे मदतीची याचना केली होती. त्यामुळे यमीन यांना भारतीय हेलिकॉप्टरपेक्षा सैनिक नकोसे झाले आहेत आणि त्यामागे चीनचाही हात आहे, असे जाणकारांचे मत आहे.