मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मोट बांधण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र विरोधी आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे. काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिले आहे. विरोधक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्त्व हळूहळू आपोआप स्वीकारतील असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांचे नेतृत्त्व देशव्यापी स्वीकारले गेल्याचा दावा खरगे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. राहुल जेव्हा काम करतात, तेव्हा सर्वच जण त्यांचे कौतुक करतात. त्याचमुळे आपोआप त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल असे खरगे यांनी स्पष्ट केले.  भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी आम्हीच पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी सर्वानी एकजूटीने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल गांधी जेथेही जातात तिथे जनतेमध्ये त्यांचे विचार ऐकण्यासाठी जनता उत्सुक असते. पुदुच्चेरी ते काश्मीरपर्यंत राहुल यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. असा अन्य कोण नेता आहे काय? ते तुम्हीच सांगा असा प्रतिप्रश्न खरगे यांनी केला. भाजप चुकीची धोरणे राबवत आहे. घटनात्मक संस्थावर आघात करत आहे. त्यामुळे त्यांना प्रथम सत्तेतून घालविणे गरजेचे आहे असे खरगे यांनी सांगितले. भाजपशी लढण्याबाबत विरोधकांची एकजूट असल्याचा दावा खरगे यांनी केला.