स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर देशासमोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात असून आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपाला संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकाता येथे भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणणारी ‘भारतीय एकता सभा’ आयोजित केली आहे. ही सभा भाजपविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या सभेत फारुख अब्दुल्ला, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, शरद यादव अशा विविध पक्षाची नेतेमंडळी उपस्थित होती. फारुख अब्दुल्ला यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारतातील एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत रहायचे आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्येही हिंसाचार सुरु आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देशात नवे संकट उभे राहिले आहे. याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. देशात अघोषित आणीबाणी असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले.

एका व्यक्तीला सत्तेतून हटवणे हा मुख्य मुद्दा नाही. देशाचे रक्षण करणे, हा मूळ उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. शरद यादव यांनी देखील देश धोक्यात असल्याचे सांगितले. काँग्रेसतर्फे अभिषेक मनू सिंघवी देखील उपस्थित होते. ते म्हणाले, मतांचे विभाजन केल्याचा फायदा फक्त भाजपाला होणार आहे. कोलकात्यातील या सभेद्वारे मतांचे विभाजन टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

देशावर संकट कोसळले असून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले. तर संविधानाचे रक्षण करण्यासाठी या सभेचे आयोजन केले, असे हार्दिक पटेल यांनी स्पष्ट केले. हार्दिक पटेल यांनीच या सभेत सर्वप्रथम भाषण केले. डीएमकेचे नेते एम के स्टालिन हे देखील या सभेत उपस्थित होते.