अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली. मात्र या दौऱ्यात अपेक्षित असताना पॉवेल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट न घेतल्यामुळे तर्कविर्तकाला ऊत आला आहे.
नॅन्सी पॉवेल यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन सुमारे ४५ मिनिटे चर्चा केल्याची माहिती राजभवनच्या सूत्रांनी दिली. मात्र या भेटीतील चर्चेबाबत अधिक माहिती दिली नाही.
दरम्यान, पॉवेल यांनी भेट टाळल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. आपल्या रोजच्या कार्यक्रमपत्रिकेतही पॉवेल यांच्यासोबत कोणतीही भेट नसल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याबाबतचे वृत्त १४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाकडूनही राज्यपालांना भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. ही भेट २१ वा २२ फेब्रुवारीला अपेक्षित होती. त्यानुसार पॉवेल यांनी राज्यपालांची भेट घेतली.
दरम्यान, पॉवेल यांनी सप्टेंबर २०१२ मध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन अमेरिकी गुंतवणुकीबाबत तसेच इतर मुद्दय़ांवर चर्चा केली होती. त्यानंतर त्याच वर्षी मे महिन्यात अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनीही बॅनर्जी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती.
मात्र शुक्रवारी पॉवेल यांनी राज्यपालांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांची भेट न घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.