24 November 2017

News Flash

ममतांची मोर्चेबांधणी!

किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणू पाहणाऱ्या तृणमूल

विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली | Updated: November 20, 2012 4:10 AM

किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणू पाहणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मोर्चेबांधणीतील हवा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सरकारविरोधातीाल अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला तर त्यातून चुकीचा संदेश जाईल, असे मत थेट विदेशी गुंतवणुकीचा घोर विरोध करणाऱ्या माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी व्यक्त केले आहे. एफडीआय आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी बॅनर्जीनी भाजप-रालोआसह सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र, लोकसभेत केवळ १९ खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या या प्रयत्नांची काँग्रेसने खिल्ली उडविली आहे.
सरकारविरुद्ध मांडावयाच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेतील किमान १० टक्के म्हणजे ५४ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक असते. पण १९ खासदार असूनही तृणमूल काँग्रेसने सरकारविरुद्ध ही मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जीनी रविवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अविश्वास प्रस्तावासाठी भाजपच्या समर्थनाची मागणी केली. ममता बॅनर्जीना भाकपने पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले आहे. पण थेट विदेशी गुंतवणुकीचा सर्वाधिक विरोध करणाऱ्या माकपने मात्र ममतांच्या प्रयत्नांना हातभार लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यास त्यातून चांगले संकेत जाणार नाहीत, असे प्रकाश करात यांचे म्हणणे आहे. भाजपनेही ममतांच्या आवाहनाला उत्साही प्रतिसाद दिलेला नाही. सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मोडीत निघाला तर पुढचे सहा महिने अविश्वास प्रस्ताव मांडता येणार नाही आणि सरकार आपोआप सुरक्षित होईल, असे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.       

First Published on November 20, 2012 4:10 am

Web Title: mamta started adjustment