पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला ‘तो’ व्यक्ती रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंगचा (रॉ) या भारताच्या गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचा पाकिस्तानचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या त्या व्यक्तीचा सरकारशी काहीही संबंध नसून तो केवळ भारताच्या नौदल विभागाचा निवृत्त अधिकारी होता, असे स्पष्टीकरणे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार कुलभूषण यादव या भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱयाला गुरूवारी बलुचिस्तानात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीत कराची व बलुचिस्तानातील वांशिक दंगलींना मदत केल्याचे त्याने प्राथमिक तपासात मान्य केले असल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या त्याला एका विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले असून तेथे सुरक्षा दलांकरवी त्याची चौकशी केली जात आहे.