आई आणि मुलगा हे जगातले सगळ्यात सर्वश्रेष्ठ नाते आहे. आई मुलासाठी काहीही करू शकते आणि मुलगाही तिच्यासाठी काहीही करु शकतो अशी अनेक उदाहरणे आहेत. असेच एक उदाहरण उत्तर प्रदेशात बघायला मिळाले आहे. आपल्या आजारी आईला अँब्युलन्सची वाट पाहावी लागत असल्याने एका मुलाने तिला लावण्यात आलेला ऑक्सिजन सिलिंडर उचलून धरला. मन हेलावून टाकणारे हे दृश्य अनेकांनी पाहिले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी अंगुरा देवी या वृद्ध महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना आग्रा मेडिकल रूग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर गुरुवारपासून उपचार सुरु करण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणारे सिलिंडरही लावण्यात आले होते. दोन दिवस उपचार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अंगुरादेवी यांना पुढील उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात येणार होते. त्यांना ज्या ठिकाणी दाखल करण्यात आले होते तो वॉर्ड ते ट्रॉमा सेंटर हे अंतर जास्त असल्याने तुम्हाला घेण्यासाठी अँब्युलन्स येईल असे सांगण्यात आले. मात्र अँब्युलन्स न आल्याने अंगुरा देवी आणि त्यांचा मुलगा वाट पाहात होते. याच दरम्यान आपल्या अंगुरा देवी यांना लावण्यात आलेला ऑक्सिजिन सिलिंडर त्यांच्या मुलाने खांद्यावर उचलून धरला.

अंगुरा देवी यांचा मास्क लावलेला आणि त्यांच्या मुलाने सिलिंडर उचलून धरलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या दोघांना ट्रॉमा सेंटरमध्ये जाण्यासाठी अँब्युलन्सची वाट बराच वेळ बघावी लागली असे एएनआयने म्हटले आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत रूग्णालय प्रशासनाला जाबही विचारला आहे. तसेच या आई आणि मुलाबाबत सहानुभूतीही व्यक्त केली आहे.