सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सोमवारी देशभरातील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. निदर्शने, मोर्चे काढून विद्यार्थ्यांनी पोलीस कारवाईच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. आजही दिल्लीमध्ये निदर्शने आणि मोर्चे सुरु आहेत. या हिंसाचारानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये पोलिसांबरोबर एक व्यक्ती लाल रंगांचा टीशर्ट आणि जीन्समध्ये असल्याचे दिसत आहे. ही व्यक्ती भाजपाप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र ही व्यक्ती नक्की कोण आहे याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

जामिया विद्यापिठामधील काही विद्यार्थिनींना लाठीने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या विद्यार्थिनींचे मित्र त्यांना पोलिसांच्या मारापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये पोलिसांबरोबर एक लाल रंगाच्या शर्टमधील व्यक्ती दिसत आहे. लाल रंगाचा टीशर्ट, जीन्स घातलेल्या या व्यक्तीच्या हातामध्ये लाठी, डोक्यावर साधे हेल्मेट आणि अंगावर चेस्ट गार्ड घातल्याचे दिसत आहे. ही व्यक्ती या मुलींना काठीने मारताना व्हिडिओत दिसते. ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पडला. मात्र आता पोलिसांनीच यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमधील व्यक्ती ही पोलीस कॉन्सटेबलच आहे. साध्या कपड्यांमधील या कॉन्सटेबलला अॅण्टी-ऑटो थेफ्ट स्वॉड (एएटीएस) म्हणजेच गाडी चोरांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये नियुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द प्रिंट’शी बोलताना दिली आहे.

सोमवारपासून सोशल नेटवर्किंगवर या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी ही व्यक्ती म्हणजे भरत शर्मा असल्याचा दावा केला होता. भरत शर्मा हा भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) कार्यकर्ता तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे स्क्रीनशॉर्टवरुन अनेकांनी शेअर केले होते. पोलिसांनी लाठी, चेस्ट गार्ड आणि हेल्मेट देऊन भरतला जामिया विद्यापिठामधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामध्ये सहभागी करुन घेतल्याचा आरोप काहींनी केला होता. “ही व्यक्ती भरत शर्मा नाही. दिल्ली पोलिसांची बदनामी करण्यासाठी हा फोटो शेअर करुन अफवा पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. त्या फोटोमधील व्यक्ती ही दक्षिण दिल्लीमधील एएटीएसचा कॉन्सटेबल आहे. त्याची त्याच भागात नियुक्ती करण्यात आली होती,” अशी माहिती दिल्ली (मध्य) पोलिस उपायुक्त एम. एस. रंधावा यांनी दिली ‘द प्रिंट’ला दिली आहे.

पोलीस खात्यामधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी दिल्लीमधील न्यू फ्रेण्ड्स कॉलीनी परिसरामध्ये जामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर अतिरिक्त पोलिसांचा पाचारण करण्यात आले. त्यामध्ये एएटीएसच्या जवानांचाही समावेश होता. साध्या कपड्यांमध्ये पोलिसांना तैनात करता येते का? असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आला असता त्यांनी “या आधीही अशाप्रकारे पोलिसांना तैनात करण्यात आल्याची उदाहरणे आहेत,” असे उत्तर दिले. एएटीएस तसेच विशेष दलातील पोलिसांना साध्या कपड्यांमध्ये तैनात केले जाते.

आणखीन एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांना लाथ मारताना दिसत आहे. ही व्यक्ती भरत शर्मा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही व्यक्ती भरत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं असून आम्ही या व्यक्तीचा शोध घेत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीचा आणि त्या फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा काहीही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दिल्ली पोलिसांबरोबरची व्यक्ती एबीव्हीपीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला होता. मात्र आता त्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट झालं आहे.