सामान्यपणे तुरुंगामधून मोठी शिक्षा भोगून आल्यानंतर कैदी आयुष्याला कंटाळतात किंवा अधिक हिंसक होऊन पुन्हा गुन्हेगारी विश्वाकडे वळतात. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करणारे अगदीच मोजके लोकं असतात. गुजरातमधील भावनगरमध्ये सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या कैद्याची चर्चा आहे. येथे राहणाऱ्या भानूभाई पटेल नावाच्या कैद्याने आठ वर्षांच्या तुरुंगवासाच्या कालावधीमध्ये ३१ पदव्या घेतल्या. विशेष म्हणजे तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला सरकारी नोकरीचीही ऑफर मिळाली. नोकरीनंतर पाच वर्षांनी त्यांनी २३ पदव्या घेतल्या. यानंतर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने भानूभाईंची दखल घेत त्यांच्या या विक्रमाची नोंद घेतली.

सामान्यपणे तुरुंगामधून परतलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जात नाही. मात्र तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर भानूभाईंना अंबेडकर विद्यापिठाकडून नोकरीची ऑफऱ देण्यात आली. नोकरीनंतर त्यांनी पाच वर्षांमध्ये २३ पदव्या संपादित केल्या. त्यांनी आतापर्यंत ५४ पदव्या घेतल्या आहेत.

करोनाच्या कालावधीमध्ये भानूभाईंनी आपल्या अनुभवांचे कथन करणारी तीन पुस्तकं लिहिली आहेत. तुरुंगावासापासून विश्वविक्रमापर्यंतचा प्रवास त्यांनी गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये तीन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये कथन केला आहे. गुजरातीमधील पुस्तकाचे नाव, ‘जेलना सलिया पाछळ की सिद्धी’ असं आहे. इंग्रजीमधील पुस्तकाचे नाव बिहाइण्ड बार्स अ‍ॅण्ड बियॉण्ड असं नाव आहे. १३ व्या विधानसभा निवडणुकींमध्ये भानूभाई प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार गुजरातच्या तुरुंगांमध्ये शिक्षित कैद्यांची संख्या अशिक्षित कैद्यांपेक्षा जास्त आहे. ग्रॅज्युएट, इंजीनियर, पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण घेतलेल्या कैद्यांचाही यामध्ये समावेश आहे. आकडेवारीनुसार गुजरामध्ये ४४२ ग्रॅज्युएट, १५० टेक्निकल डिग्री-डिप्लोमा, २१३ पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण झालेले कैदी आहेत. सर्वाधिक कैदी हे हत्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत.