काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कष्टाच्या पैसे सुरक्षित करण्यासाठी नागरिकांना बँकेच्या रांगेत कसरत करावी लागत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आणि हक्काचे पैसे मिळविण्यासाठी बँकेत जाणाऱ्या नागरिकांना दिवसेंदिवस वेगवेगळे अनुभव येताना दिसत आहे. ५०० आणि हजारच्या नोटा बदलुन घेण्यासाठी तासंनतास रांगेत उभा राहिल्यानंतर नागरिकांना मिळणारी २००० हजारांची नोट सुट्टे करण्याची समस्या सामान्य बनली असताना काही नागरिकांना बॅकां चिल्लरच्या रुपात अवाढव्य रक्कम देऊन थक्क करत आहेत.

दिल्लीतील इम्तियाज नावाच्या व्यक्तीला बँकेने चक्क २० हजार रुपयाची चिल्लर दिली आहे. चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर २० हजार रुपयांची रक्कम ही चिल्लरच्या रुपात दिल्यामुळे या व्यक्तीसमोर हे पैस घरी कसे घेऊन जायचे असा प्रश्न पडला. इम्पियाज यांच्या हातात १० रुपयांच्या नाण्यांच्या रुपात ही २० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली.  इम्तियाज एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत असून जसोलाच्या जामिया सहकारी बँकेत ते रक्क्म काढण्यासाठी गेले होते. बँकेमध्ये नोटांची कमतरता असल्यामुळे त्यांना २० हजाराची रक्कम ही नाण्यांच्या स्वरुपात देण्यात आली. १० रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात देण्यात आलेल्या रक्कमेचे वजन हे तब्बल १५ किलो इतके होते.

इम्तियाज यांना बँक अधिकाऱ्यांनी १० रुपयांच्या नाण्याच्या स्वरुपात रक्क्म मिळेल असे सांगितले होते. एवढा वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर आशा स्वरुपात मिळणारी रक्कम नाकारण्याचे धाडस झाले नाही, अशी माहिती इम्तियाज यांनी म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेतून होणारा पैशाचा पुरवठा कमी झाला असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांने सांगितले अशी माहितीही यावेळी इम्तियाज यांनी दिली.