केरळमधल्या एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरेस्तोवर मारहाण केलेल्या आणि हात बांधलेल्या आदिवासी तरुणासोबत काहींनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. या आदिवासी तरुणाला चोरी करताना गावकऱ्यानं पकडलं होतं. त्यानंतर मारहाण करून त्याला दोरीनं बांधण्यात आलं. या चोरासोबत एका तरुणानं सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या चोराला गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले पण वाटतेच त्याचा मृत्यू झाला. या असंवेदनशील प्रकरणावर आता समाज माध्यमातून सडकून टीका होत आहे. सेल्फीच्या माध्यमातून पोलीस चोराला मारहाण केलेल्या गावकऱ्यांचा शोध घेत आहेत.

केरळमधील पालक्कड जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मृत तरुणाचे नाव मधू असून तो गावापासून दूर असलेल्या जंगलात राहतो. रात्रीच्या वेळी किराणा मालच्या दुकानातील धान्य चोरताना त्याला गावकऱ्यांनी पकडलं होतं. यापूर्वीही त्याला गावकऱ्यांनी चोरी करताना पकडलं होतं पण त्यानं चोऱ्या करणं सुरुच ठेवल्याचं पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइनला दिलेल्या माहितीत सांगितलं. अखेर गावकऱ्यांनी त्याला मरेस्तोवर मारहाण करून मग पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मधूला गावकऱ्यांनी बांधूनही ठेवलं होतं. यावेळी काही तरुणांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.

या तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना वाटेत उलट्या झाल्या. त्यामुळे त्याला आधी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे पोहोचण्यापूर्वी तो मृत झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलं. पोलीस आता व्हायरल होणाऱ्या सेल्फीवरून या तरुणाला मारहाण करणाऱ्या गावकऱ्यांचा शोध घेत आहेत. तसेच सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत प्रत्यक्ष सहभाग होता का याचीही चौकशी पोलीस करत आहेत.