मणिपूर सरकारने बलात्कार आणि खूनाच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोषमुक्त करण्यात आलेल्या या व्यक्तीला २०१३ साली त्याच्या सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करुन खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने या व्यक्तीच्या घरालाही आग लावली होती. स्थानिक न्यायालयामध्ये न्याय मिळण्यास उशीर झाल्याने या व्यक्तीला केवळ आरोपांमुळे आठ वर्ष तुरुंगामध्ये काढावे लागले. सोमवारी न्यायालयाने त्याची सुटका केली.

न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या तरुणाला सरकारी नोकरी देणार असल्याची घोषणा केली. “या तरुणाला सरकारी नोकरी दिली जाईल. निर्दोष असूनही त्याला आठ वर्ष तुरुंगामध्ये रहावं लागल्याची माहिती मला मिळाली. न्यायलयीन प्रक्रियेमध्ये उशीर झाल्याने त्याच्या आयुष्यातील महत्वाची आठ वर्ष तुरुंगामध्येच गेली. एवढ्या कालावमधीमध्ये त्याला काहीतरी छान करता आलं असतं. त्याने स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली असती. या घटनेनंतर जमावाने त्याचं घर जाळून टाकल्याची माहितीही मला मिळाली,” अशा शब्दांमध्ये सिंह यांनी या तरुणाला निर्दोष असतानाही तुरुंगात रहावं लागल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “आम्ही दिलेला हा प्रस्ताव तो मान्य करेल अशी मला आशा आहे. ही नोकरी स्वीकारुन तो त्याचं पुढील आयुष्य चांगल्या पद्धतीने जगेल, असा मला विश्वास आहे,” असं मत मुख्यमंत्री सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलं.

आणखी वाचा- खाज नडली… चेहरा खाजवण्यासाठी चोराने काही क्षणांसाठी मास्क काढलं अन्…

आणखी वाचा- चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणीने भोसकलं; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

काय आहे संपूर्ण प्रकरण

निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तौदम जिबल सिंह असं आहे. तौदमला रिम्स येथील पॅथलॉजी विभागातील एका ज्यूनियर रिसर्च स्कॉलरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली. ५ एप्रिल २०१३ रोजी या मुलीचा मृतदेह वांगलखेई लोकुलमधील बंधाऱ्यामध्ये सापडला होता. मृतदेह सापडण्याच्या दोन दिवस आधीपासून ही मुलगी बेपत्ता होती. इम्फाळमधील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. मनोज कुमार यांनी तौदम हा सर्व आरोपांमधून निर्दोष असल्याचा निकाल देत त्याची सुटका केली. सोमवारीच मुख्यमंत्र्यांनी तौदमची भेट घेतली. सरकारी नोकरी देण्याबरोबरच तौदमच्या कुटुंबासाठी नवीन घर बांधून देण्याचं आश्वसनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तौदमला वन विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. तौदमचे वडील वनविभागामध्येच कामाला होते, त्यामुळे त्यालाही विन विभागात सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने घेतला आहे.