News Flash

“गोमूत्र, गायीचं शेण करोनावर उपचार ठरत नाही”, भाजपा नेत्याच्या निधनावरच्या फेसबुक पोस्टमुळे पत्रकार किशोरचंद्र वांगखेम यांना अटक!

मणिपूरमध्ये पत्रकार किशोरचंद्र वांगखेम आणि सामाजिक कार्यकर्ते इरेंद्रो लेकोबम यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मणिपूर पोलिसांनी एक स्थानिक पत्रकार किशोरचंद्र वांगखेम यांच्यासोबत इरेंद्रो लेकोबम यांना फेसबुकवर स्थानिक भाजपा नेत्याच्या करोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर कथित वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक केली आहे. एवढंच नाही, तर या दोघांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात एनएसए अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजपाचे मणिपूर प्रदेश अध्यक्ष एस. टिकेंद्र सिंह यांचा करोनामुळे गेल्याच आठवड्यात दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. त्यानंतर ४१ वर्षीय स्थानिक पत्रकार किशोरचंद्र वांगखेम आणि इरेंद्रो लेकोबम यांनी फेसबुक एक पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून भाजपा नेत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं झालं काय?

भाजपाचे मणिपूर अध्यक्ष टिकेंद्र सिंह यांचं करोनामुळे निधन झाल्यानंतर त्यावर किशोरचंद्र वांगखेम यांनी शोक व्यक्त करतानाच “गोमूत्र किंवा गायीचं शेण करोनावर उपचार नाहीत”, अशी फेसबुक पोस्ट केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. पीपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्सचे सदस्य इरेंद्रो लेकोबम यांनी देखील अशाच प्रकारची पोस्ट केली होती. यासंदर्भात मणिपूर भाजपाचे उपाध्यक्ष उशम देबन आणि सचिव पी. प्रेमानंद मीतेई यांनी पोलिसांत या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून किशोरचंद्र आणि इरेंद्रो या दोघांना त्यांच्या घरून पोलिसांनी अटक केली आहे. इम्फाळ पश्चिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. के. मेघचंद्र सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, किशोरचंद्र आणि इरेंद्रो या दोघांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर १५३ अ, ५०५ ब २, २९५ अ, ५०३, ५०४ आणि ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kishorechandra Wangkhem fb post screenshot किशोरचंद्र वांगखेम यांची फेसबुक पोस्ट

“किशोरचंद्र यांची कृती ही राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने धोकादायक होती, याबद्दल माझी खात्री झाली आहे”, अशी टिप्पणी इम्फाळ पश्चिम जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी किरणकुमार यांनी NSA ऑर्डरमध्ये लिहिली आहे.

दोन वर्षांपूर्वीही किशोरचंद्र यांना अटक!

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी २०१८मध्ये देखील किशोरचंद्र वांगखेम यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०१९मध्ये त्यांची सुटका झाली होती. त्याचप्रमाणे, इरेंद्रो यांच्यावर देखील गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या फेसबुक पोस्टवरून अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या काही नेत्यांनी, आमदार-खासदारांनी गोमूत्र आणि गायीचं शेण करोनाविरोधात उपचार म्हणून उपयुक्त असल्याचे दावे केले होते. या नेत्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून बरीच संमिश्र चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली होती. दोनच दिवसांपूर्वी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोमूत्र प्यायल्यामुळेच मला करोना होत नसल्याचं विधान केलं होतं. “देशी गायीचे गोमूत्र आपण प्यायलो तर फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. पण मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच करोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला करोनाही झाला नाही”, असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या.

 

तर अशाच प्रकारे भाजपाचे उत्तर प्रदेशमधील आमदार सुरेंद्रसिंह यांचा करोनावर गोमूत्र उपचार असल्याचा दावा करणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. “फक्त आणि फक्त गोमूत्रच करोनाला नियंत्रणात आणू शकेल”, असं ते म्हणाले होते.

 

भाजपाचे बुलंदशहरचे आमदार देवंद्रसिंह लोधी यांनी देखील असाच दावा केला होता “गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि करोनासारखे आजार होणार नाहीत. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते”, असं त्यांचं म्हणणं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 9:02 pm

Web Title: manipur journalist kishorechandra wangkhem arrested facebook post on cow urine on corona pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधितांसह सगळेच एकत्र; ‘चमत्कारी’ औषधासाठी सगळ्यांच्या लांबच लांब रांगा!
2 देशातील करोना लसीकरण २-३ महिन्यात पूर्ण होणं अशक्य- अदर पूनावाला
3 Corona : मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा!
Just Now!
X