भारत आणि अमेरिका यांच्यात लष्करी सहकार्य तसेच द्विपक्षीय संबंध वाढीस लागण्याच्या हेतूने भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची २७ सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊसमध्ये चर्चा होणार आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस तसेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगेल यांच्यात मंगळवारी विस्तृत चर्चा होऊन सिंग आणि ओबामा यांच्या भेटीचा तपशील ठरविण्यात आला. मनमोहन सिंग यांचा हा दौरा लहान असला तरी त्याला महत्त्व असून तो चांगला होईल, असे मेनन यांनी सांगितले. या दौऱ्याचा अन्य तपशील ठरविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. संरक्षण करारावर काम सुरू असून ते महत्त्वाचे आहे. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांचा विकास, सहनिर्मिती आदी विषयांवर मतैक्य घडविण्याचा मूळ हेतू असल्याची माहिती मेनन यांनी दिली.
ओबामा हेही सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे राइस यांनी मेनन यांना सांगितले. या भेटीत राइस यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी साहचर्याचा आढावा घेतला. भारतासमवेत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यास अमेरिका बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.