केवळ ४२ जण वाचल्याची शक्यता
वेगाने येणाऱ्या चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबलेल्या अनेक बोटी म्यानमारच्या पश्चिमेकडील तटवर्ती क्षेत्रात बुडाल्याचे खळबळजनक वृत्त आहे.
या बोटींमध्ये रोहिंग्य मुस्लीम बहुसंख्येने होते आणि त्यापैकी केवळ ४२ जणच वाचल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत आठ मृतदेह हाती लागले असून ५० हून अधिक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवतावादी व्यवहार समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकामुळे स्थलांतरित झालेले रोहिंग्य मुस्लीम म्यानमारच्या राखीन राज्यात वास्तव्याला होते. हे मुस्लीम नागरिक या बोटींमध्ये होते.
पौकताव शहरातून जवळपास पाच बोटी निघाल्या होत्या. या बोटी एकमेकांना ओढत नेत असताना त्यापैकी एक बोट खडकावर आदळून ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये बोटीवर सर्व प्रवासी बुडाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित अधिकारी जेम्स मून यांनी सांगितले.