सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरण

दिल्लीतील २०१२मधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका दोषीच्या दया याचिकेवर निर्णय होईपर्यंत आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी दिल्ली न्यायालयाने सोमवारी पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची फाशी तिसऱ्यांदा टळली आहे.

यापूर्वीच्या आदेशानुसार, चौघाही दोषींना आज, मंगळवारी सकाळी ६ वाजता फाशी दिले जाणार होते. या चौघांच्या फाशीची अंमलबजावणी आतापर्यंत तिसऱ्यांदा पुढे ढकलली गेली आहे. दोषी पवन गुप्ता याच्या दया याचिकेचा निर्णय लागेपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी दिला.

‘दोषीची दयेची याचिका निकाली निघेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे एकूण चर्चेनंतर माझे मत आहे. त्यामुळे सर्व दोषींविरुद्धच्या ‘डेथ वॉरंट’ची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्यात येत आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला. आपण सोमवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला असल्यामुळे फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या पवन गुप्ता याच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला.

मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ जारी करताना, त्यांना ३ मार्चला फाशी द्यावे, असा आदेश न्यायालयाने १७ फेब्रुवारीला दिला होता. यापूर्वी ७ जानेवारीला पहिल्यांदा ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले होते आणि त्यांची अंमलबजावणी १७ जानेवारी व नंतर ३१ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.

यापूर्वी, ‘डेथ वॉरंट’ला स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या पवनच्या याचिकेवर आदेश राखून ठेवताना न्यायालयाने क्युरेटिव्ह आणि दया याचिका सादर करण्यातील विलंबाबद्दल त्याच्या वकिलांना खडे बोल सुनावले. पवनची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दुपारी फेटाळली होती.

डेथ वॉरंटला स्थगिती मागणारे पवन आणि त्याचा सहआरोपी अक्षय कुमार सिंह यांचे अर्ज कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी दुपारी फेटाळले होते. मात्र, पवनने दया याचिका केली असल्यामुळे फाशीची अंमलबजावणी थांबवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्याचे वकील ए.पी. सिंह यांनी केला. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर दुपारनंतर सुनावणी केली.

दया याचिका सादर करण्यात आल्यानंतर पुढील निर्णय सरकारच्या हाती असून, न्यायाधीशांची यात काही भूमिका नाही, असे तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. पवनच्या दया याचिकेवर राष्ट्रपती तुरुंगाकडून सद्य:स्थितीदर्शक अहवाल मागवतील आणि जेव्हा असे घडेल, तेव्हा आम्ही स्वत:च फाशीची अंमलबजावणी स्थगित करू, असे ते म्हणाले. दोषींना फाशी देण्यात होणारा विलंब हा आपल्या व्यवस्थेचे अपयश दर्शवतो, असे पीडितेच्या आईने सांगितले. दोषींनी काहीही केले, तरी  त्यांना फासावर चढवले जाईलच, असेही त्या म्हणाल्या.