भारतीय सैन्यदलाच्या पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ असघर यांच्यासह आणखी दोघांकडून  हलविण्यात आल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. १९९९मधील ‘इंडियन एअरलाइन्स’च्या आयसी-८१४ विमानाच्या अपहरणाचा सूत्रधार रौफ हाच होता.

या चौघांचा तपशील पाकिस्तानला कळविण्यात आल्याची आणि दोन्ही देशांदरम्यानची भविष्यातील चर्चा सुकर व्हावी, यासाठी या चौघांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी भारताने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्याचा कट लाहोरजवळ शिजल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ही बाब पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार नासीर खान जंजुआ यांच्या कानावर घातल्याचे सूत्रांनी सांगितले. या घडामोडींमुळे इस्लामाबाद येथे १५ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या दोन्हीही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अझर आणि रौफसह अश्फाक आणि कासीम यांची नावे भारताने पाकिस्तानला कळविली आहेत. १९९९मध्ये काठमांडू येथून अपहरण करण्यात आलेले भारतीय विमान अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले होते. तिथे आठ दिवस ओलीस ठेवलेल्या भारतीय प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अझरसह तिघा ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. रौफने या कटात कळीची भूमिका बजावली होती. या चौघांबाबत काय कारवाई करावी, अशी विचारणा पाकिस्तानने भारताला केली होती. त्यावर त्यांना अटक करून भारताच्या स्वाधीन करावे. जेणेकरून त्यांची याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे उत्तर भारताच्या वतीने देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वापरलेले काही साहित्य पाकिस्तानी बनावटीचे असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकतेच सांगितले होते. नववर्षांच्या उत्तररात्री झालेल्या या हल्ल्यातील सहाही दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले होते.