किश्तवारमधील हिंसाचार रोखण्यात जम्मू-काश्मीरमधील सरकार अपयशी ठरले असल्याने ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सोमवारी केली. किश्तवारमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये मायावती यांनी ही मागणी केली.
त्या म्हणाल्या, किश्तवारमध्ये जे काही घडले त्याचा आम्ही निषेध करतो. पहिल्याच दिवशी राज्य सरकारने कारवाई करायला हवी होती. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच दंगलीचा भडका उडाला. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात केंद्र सरकारने भूमिका वठवली पाहिजे. हिंसाचार कोणी घडवला, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमली पाहिजे, अशीही अपेक्षा मायावती यांनी व्यक्त केली.