एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा तामिळ, तेलुगू, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती अशा सहा प्रादेशिक भाषातून २०१६-१७ मध्ये घेण्याची परवानगी केंद्र सरकारने मागितली असून त्यावर विचार करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

याबाबतची याचिका न्या. ए.आर.दवे यांच्यापुढे महाधिवक्ता रणजित कुमार यांनी मांडली असून त्यावर न्यायालयाने सांगितले की, आम्ही ते तुमच्यावर सोडतो. न्या. शिवकीर्ती सिंग व न्या.ए.के.गोयल यांनी या प्रकरणी लवकरच सुनावणी करण्यात येईल.

याच पीठाने असे सांगितले होते की, एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा राहील. राज्य सरकारांनी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याची केलेली विनंती फेटाळण्यात येत आहे. २८ एप्रिल रोजी न्यायालयाने असे म्हटले होते की, सीबीएसइ व केंद्र सरकार एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेईल. आता एनइइटी २ परीक्षा २४ जुलैला होणार असून त्याचा निकाल १७ ऑगस्टला जाहीर होईल. त्यानंतर तीस सप्टेंबपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. एनइइटी १ परीक्षा १ मे रोजी साडेसहा लाख मुलांनी दिली होती.