पाकिस्तानी सैनिकांकडून निर्दोष नागरिकांची केली जाणारी हत्या थांबावावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना खरमरीत पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकार पाकिस्तानी सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या निर्दोष नागरिकांच्या हत्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे. हे सर्व प्रस्थापित मानवतावादी निकषांच्या आणि व्यावसायिक लष्करी आचरणांच्या विरूद्ध आहे.

पत्रात हे देखील म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी निर्दोष नागरिकांच्या हत्येसाऱख्या कृत्यांचा तपास करावा आणि आपल्या सैन्याला अशाप्रकारचे कृत्य करण्यापासून थांबवावे. पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण गोळीबार आणि एका निर्दोष भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आल्यानंतर मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे, मंगळवारी पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अनेक सामान्य नागरिकही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर बुधवारी देखील जम्मू-काश्मीरमधील राजौरीत सीमा भागात गोळीबार करण्यात आला.