मागील काही दिवसांत दिल्लीत करोनाचा उपद्रव वाढला असून, रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यानं सरकारसमोरील आव्हानात भर पडली आहेत. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी दिल्ली सरकार शर्थीचे प्रयत्न करत असतानाच सर्वात मोठं कोविड रुग्णालय असलेल्या लोक नायक रुग्णालयाचे संचालक आणि यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

देशात मुंबईनंतर दिल्लीतील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी चार कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लोक नायक रुग्णालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. सुरेश कुमार यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “डॉ. सुरेश कुमार यांना करोना झाल्याचं निष्पन्न होताच आम्ही संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणं सुरू केलं. जवळपास वरिष्ठ डॉक्टरांसह ३० आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातच शनिवारी सकाळी आणखी दोन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनानं हॉस्पिटल स्वच्छ करण्यासाठी काही काळ बंद केलं होतं,” अशी माहिती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. लोक नायक रुग्णालय सध्या कोविड हॉस्पिटल असून तिथे फक्त करोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. सध्या या रुग्णालयात २ हजार बेडची व्यवस्था आहे.

दुसरीकडे जीटीबी रुग्णालयातील यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. ए.के. जैन आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाला करोनाचा संसर्ग झाला आहे. जीटीबी रुग्णालयातील ५०० बेड करोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तिथेच जैन यांचं कार्यालय असून, ते कार्यालय सील करण्यात आलं आहे, असं जीटीबी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने सांगितलं.

दिल्लीत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अटल बिहारी वाजपेयी इन्सिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठातांना करोना झाला होता. त्यानंतर डॉ. राजीव सूद यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनासंबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नियोजन सूद यांच्याकडे होतं. दिल्लीत आतापर्यंत ६०० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या सध्या १७,००० इतकी आहे.