प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्कल (Meghan Markle) यांच्यावर आपल्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे आरोप करण्यात आले आहेत. याचसंदर्भात लवकरच मार्कल यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसने (Buckingham Palace) जारी केलेल्या पत्रकामध्ये मार्कल यांच्याविरोधात चौकशी सुरु करणार असल्याची माहिती देण्यात आलीय. तसेच राजघराण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या आरोपांसंदर्भातही बकिंगहॅम पॅलेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार केस्टिंगटन पॅलेसमध्ये वास्तव्य असलेल्या कालावधीमध्ये मार्कल यांनी कर्मचाऱ्यांना धमकावल्याची तक्रार करण्यात आली होती.

टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्केल यांनी पॅलेसमधील दोन खासगी कर्मचाऱ्यांना घराबाहेर काढलं होतं. तसेच त्यांनी अन्य एका कर्मचाऱ्याचा पाणउतारा केला केला.  बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या पत्रकामध्ये वृत्तपत्रातील बातमीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र या आरोपांना गांभीर्याने घेण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या घटनेसंदर्भातील अधिकृत तक्रार पॅलेसच्या प्रशासनाकडे मेगन यांचे पती प्रिन्स हॅरींसाठी काम करणारे तत्कालीन संपर्क सचीव असणाऱ्या जेसन नॉफ यांनी केली होती. सध्या नॉफ हे हॅरी यांचे भाऊ प्रिन्स विलियम्स यांच्यासाठीही काम करतात.

पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार बातमीमध्ये देण्यात आलेल्या तपशीलासंदर्भात तपासणी केली जाणार आहे. सध्या पॅलेसमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांबरोबरच जुन्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. “राजघराण्याचे व्यवस्थापन आणि काम याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे,” असं या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच पुढे, “असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणी एखाद्याचे शोषण किंवा त्याच्याशी केलेली गैरवर्तवणूक सहन केली जाणार नाही,” असंही पॅलेस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

हॉलिवूड अभिनेत्री असणारी मेगन मार्कल लग्नाआधी सूट्स या टीव्ही मालिकेमध्ये झळकली होती. त्यांनी ब्रिटीश राजघराण्याचे धाकटे युवराज हॅरीसोबत १९ मे २०१८ रोजी विवाह केला. लग्नानंतर एका वर्षाने मेगन आई झाल्या. २०२० साली मेगन आणि हॅरी यांना राजघराण्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भात घोषणा केली. सध्या हे दोघेही आपल्या मुलांसोबत अमेरिकेत वास्तव्यास आहेत.