बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० चा उल्लेख केला. आम्ही कलम ३७० रद्द केलं. मात्र हे लोकं (काँग्रेस आणि मित्र पक्ष) सत्तेत आल्यास ते परत आणू असं म्हणतात. त्यावर ते प्रचारसभांमधून मतं मागण्याची हिंमतही करतात, असं मोदी म्हणाले. हा बिहार राज्याचा अपमान नाहीय का? बिहारमधील लोकं त्यांच्या घरातील मुलांना, मुलींना देशासाठी सीमेवर लढायला पाठवतात त्यांचा हा अपमान नाहीये, तर काय आहे? असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. मात्र आता यावरुनच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अजूनही मोदींना निवडणूक प्रचारासाठी कलम ३७० चा मुद्दा वापरावा लागतोय, यावरुनच सरकारकडे दाखवण्यासारखं काहीच काम नसल्याचा टोला लगावला आहे.

मुफ्ती यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी कलम ३७० चा मुद्दा बिहार निवडणुकीमध्ये वापरला जात असल्याचा उल्लेख करत भाजपा सरकारवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुफ्ती यांनी “आपण आर्थिक स्तरावर बंगलादेशच्याही मागे पडलो आहोत. रोजगार असो किंवा इतर कोणताही मुद्दा असो प्रत्येक ठिकाणी सरकार अपयशी ठरलं आहे,” असं म्हटलं आहे.

“सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारकडे असं कोणतंही काम नाहीये की ज्याच्या आधारे ते मतं मागू शकतील. आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येईल, असं हे निवडणुकीच्या प्रचारात सांगत आहेत. त्यानंतर (करोना) लस मोफत देणार सांगत आहेत. आजही पंतप्रधान मोदींना मत मागण्यासाठी कलम ३७० बद्दल बोलावं लागत आहे,” असा टोला मुफ्ती यांनी लगावला आहे.

मोदींच्या आजच्या भाषणाआधी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारसभेमध्ये कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येईल असं वक्तव्य केलं होतं. याच सर्व मुद्द्यांवरुन मुफ्ती यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे.