पत्रकार प्रिया रमाणी यांनी केलेले आरोप फेटाळून लावत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी कोर्टात धाव घेतली. अकबर यांनी प्रिया यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला. आता प्रिया रमाणी यांच्याबाजूने १९ महिला पत्रकार कोर्टात साक्ष देणार आहेत. या १९ महिला पत्रकारांनी कोर्टात स्वाक्षरीसह एक विनंती अर्ज केला असून आम्हालाही याप्रकरणी साक्ष नोंदवायची आहे, असे त्यात विनंती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ महिला पत्रकारांच्या पाठिंब्यामुळे आता प्रिया रमाणी यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. या १९ महिला पत्रकारांनी अकबर यांच्याबरोबर काम केले आहे. अकबर ‘एशियन एज’चे संपादक असताना त्यांच्यासोबत या महिला पत्रकारांनी काम केले आहे. त्यामुळे आता १९ महिला पत्रकार विरूद्ध अकबर असा सामना कोर्टात पहायला मिळणार आहे. सोमवारी अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अकबर यांनी आमच्या माजी सहकारी प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला आहे. अकबर आपल्या पदाच्या जोरावर हे सगळं करत आहेत. मात्र, त्यांनी जुन्या गोष्टी टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या लढाईत आम्ही रमाणी यांच्यासोबत आहोत. म्हणूनच मानहानीच्या दाव्यावर सुनावणी घेत असताना आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे या महिला पत्रकारांनी विनंती अर्जात नमूद केले आहे.

रमाणी यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या १९ महिला पत्रकारांमध्ये सध्या तीन संपादक पदावर कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई मिरर आणि डेक्कन क्रॉनिकलच्या संपादक पदावर कार्यरत आहेत. तर तिसरी महिला पत्रकार ‘एशियन एज’च्या निवसी संपादक आहेत. तीन महिला संपादक #MeToo अभियानामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मंगळवारी तुषिता पटेल यांनी अकबर यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. एम. जे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा किस केले. तसेच एकदातर ते चक्क अंतर्वस्त्रातच आपल्यासमोर आल्याचा आरोप महिला पत्रकार तुषिता पटेल यांनी केला आहे. स्क्रोल या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखामधून पटेल यांनी हा आरोप केला आहे.

या १९ महिला पत्रकारांनी रमाणी यांना दिला पाठिंबा
मीनल बघेल
मनिषा पांडे
तुषिता पटेल
कनिका गहलोत
सुपर्णा शर्मा
रामोला तलवार बादाम
कनिझा गाझारी
मालविका बॅनर्जी
ए. टी. जयंती
हमिदा पारकर
जोनाली बोरागोहेन
संजरी चटर्जी
मीनाक्षी कुमार
सुजाता दत्ता सचदेव
होइनु हॉजेल
रेश्मी चक्रवर्ती
कुशालराणी गुलाब
आयशा खान
किरण मनराल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metoo 19 asian age women ask court to consider their stories in mj akbar defamation case
First published on: 17-10-2018 at 01:09 IST