ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. करोनाचं संकट अधिक वाढू नये यासाठी कडक निगराणी आणि काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, नुकतेच ब्रिटनहून भारतात परतलेले काही लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.

गृह मंत्रालयाने म्हटलं की, “कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल. कन्टेंन्मेंट झोनमध्ये सुरुवातीपासून निश्चित करण्यात आलेल्या संसर्ग रोखण्याच्या उपायांचे कडक पद्धतीने पालन केलं जाईल. कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग राखण्यासारख्या नियमांचे सक्तीने पालन करावे लागेल.”

करोनाच्या सक्रिय आणि नव्या प्रकरणांमध्ये देशात सातत्याने घट दिसून आली आहे. परंतू जागतीक स्तरावर या आजाराची वाढती प्रकरणं लक्षात घेता निगराणी, संसर्ग रोखणे आणि सावधानी राखणे गरजेचे आहे. खासकरुन ब्रिटनमध्ये नव्या करोनाच्या संसर्गाचे संक्रमण समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेणं गरजेचं असल्याचं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.