सर्वत्र उपलब्ध असलेल्या बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे जगातील मोठय़ा कंपन्यांच्या ब्रँड्सच्या परीक्षणात आढळून आले आहे.

अशा प्रकारच्या आजवरच्या सर्वात मोठय़ा अन्वेषणात, नऊ वेगवेगळ्या देशांमधील २५० बाटल्यांचे परीक्षण करण्यात आले. ‘ऑर्ब मीडिया’ या पत्रकारिता संस्थेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या संशोधनात, एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे सरासरी १० कण आढळून आले. हा प्रत्येक कण मानवी केसाच्या जाडीपेक्षा मोठा होता. ज्या कंपन्यांच्या ब्रँड्सचे परीक्षण करण्यात आले, त्यांनी आपल्या बॉटलिंग संयंत्रांमधे उच्च दर्जा राखला जात असल्याचे बीबीसीला सांगितले.

या चाचण्या फ्रेडोनियातील ‘स्टेट युनिव्‍‌र्हिसिटी ऑफ न्यूयॉर्क’मध्ये करण्यात आल्या. जवळजवळ सर्वच बाटल्यांमधे आणि सर्वच ब्रँड्समधे आम्हाला प्लास्टिक आढळून आले, असे या विद्यापीठातील रसायनशास्त्राच्या प्राध्यापक शेरी मॅसन यांनी बीबीसीला सांगितले. एखाद्या विशिष्ट ब्रँडकडे अंगुलीनिर्देश करण्याचा हा मुद्दा नाही. प्लास्टिक हा पदार्थ आपल्या समाजात व्यापक असून तो पाण्यालाही व्यापत असल्याचे दिसून येत आहे. ही सर्व उत्पादने आपण नेहमीच उपयोगात आणत असलेली आहेत.

प्लास्टिकचे सूक्ष्म कण (मायक्रोप्लास्टिक्स) पोटात गेल्याने नुकसान होते असा आत्ता पुरावा नसला, तरी त्याचे संभाव्य परिणाम समजून घेणे हा विज्ञानाच्या कार्यकक्षेचा विषय आहे. ज्या प्रमाणात हे घडते आहे ते प्रलयंकारी नसले, तरी हा चिंतेचा विषय आहे, असे या चाचण्यांच्या निष्कर्षांबाबत प्रतिक्रिया देताना प्रा. मॅसन म्हणाल्या.

आपली उत्पादने सुरक्षितता आणि गुणवत्ता यांचा उच्चतम दर्जा राखून तयार केली जातात, असे चाचण्या केलेल्या ब्रँड्सच्या उत्पादक कंपन्यांनी सांगितले. मायक्रोप्लास्टिक्सबाबत सध्या कुठलेही नियम नाहीत, तसेच त्यांची तपासणी करण्यासाठी प्रमाणित पद्धतीही नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्लास्टिकच्या वापराबाबत जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बीबीसीच्या ‘ब्लू प्लॅनेट २’ या प्रशस्तीपात्र मालिकेमुळे त्यात भर पडली. महासागरांतील टाकाऊ प्लास्टिकमुळे निर्माण झालेल्या धोक्याकडे सर डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांनी यातून लक्ष वेधले होते. बाटलीबंद पाण्याच्या परीक्षणासाठी ११ वेगवेगळे जागतिक व राष्ट्रीय ब्रँड्स निवडण्यात आले होते. मोठी लोकसंख्या किंवा बाटलीबंद पाण्याचा तुलनात्मकदृष्टय़ा जास्त वापर या आधारे त्यांची निवड करण्यात आली होती.

प्लास्टिकचे ‘स्क्रीनिंग’ करण्यासाठी प्रत्येक बाटलीत ‘नाईल रेड’ नावाचा रंग मिसळण्यात आला. समुद्राच्या पाण्यातील प्लास्टिक शोधून काढण्यासाठी ब्रिटिश शास्त्रज्ञांनी अलीकडेच ही पद्धत शोधून काढली आहे. हा रंग पाण्यात मुक्तपणे तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या तुकडय़ांना चिकटतो आणि प्रकाशाच्या काही तरंगांखाली त्यांना चमकदार बनवतो, असे यापूर्वीच्या अभ्यासात सिद्ध झाले आहे.

प्रा. मॅसन व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे रंगीत नमुने गाळून घेतले आणि १०० मायक्रॉनपेक्षा (मानवी केसाच्या जाडीइतक्या) मोठय़ा असलेल्या प्रत्येक तुकडय़ाची मोजणी केली. यापैकी काही तुकडय़ांचे नंतर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे विश्लेषण करण्यात आले असता ते प्लास्टिक असल्याचे निश्चित झाले.

परीक्षण केलेले आंतरराष्ट्रीय ब्रँड्स

  • अ‍ॅक्वाफिना
  • दसानी
  • एव्हियन
  • नेस्ले प्युअर लाईफ
  • सॅन पेलेग्रिनो

आघाडीचे राष्ट्रीय ब्रँड्स

  • अ‍ॅक्वा (इंडोनेशिया)
  • बिसलेरी (भारत)
  • एपुरा (मेक्सिको
  • गेरोलस्टेनर (जर्मनी)
  • मिनाल्बा (ब्राझिल)
  • वाहाहा (चीन)