नवी दिल्ली : टाळेबंदीमुळे स्थलांतरितांची जी समस्या निर्माण झाली आहे ती फाळणीनंतरची भारतातील  सर्वात मोठी मानवनिर्मित शोकांतिका आहे,असे मत इतिहासतज्ज्ञ व अर्थशास्त्रज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले आहे.

या सगळ्या पेचप्रसंगाचे देशातील इतर भागात अनेक सामाजिक व मानसशास्त्रीय परिणाम होणार आहेत असे सांगून ते म्हणाले,की स्थलांतरितांची ही परवड टाळता आली असती किंबहुना कमी तर नक्कीच करता आली असती. पंतप्रधान मोदी यांनी  स्थलांतरितांना घरी परतण्यासाठी टाळेबंदीपूर्वीच एक आठवडय़ाची सूचना द्यायला पाहिजे होती, ती दिली नाही त्यामुळेच स्थलांतरितांवर ही वेळ आली आहे. सध्याची स्थिती फाळणीइतकी वाईट नाही हे खरे असले तरी भयानक आहे यात शंका नाही. फाळणीच्या काळात जातीय हिंसाचार झाला होता तसे काही यात नाही, पण तरी फाळणीनंतरची ही सर्वात मोठी मानवनिर्मित शोकांतिका आहे.

२४ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी टाळेबंदी जाहीर केली होती. त्यात रेल्वे वाहतूक, रस्ते व विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर टाळेबंदी तीनदा वाढवण्यात आली, नंतर एप्रिलपासून काही सवलती देण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रिडीमिंग द रिपब्लिक ’व ‘इंडिया आफ्टर गांधी’ या दोन पुस्तकांचे लेखक असलेल्या गुहा यांनी म्हटले आहे,की पंतप्रधानांनी अशा प्रकारे निर्णय कसे घेतले हे समजत नाही. त्यांनी कुणा जाणकार अधिकाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी सल्लामसलत केली होती की नाही हे माहिती नाही, त्यांनी हा निर्णय एकतर्फी घेतला की काय हा प्रश्न आहे.