काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. येथील अवंतीपोरा सेक्टरमध्ये सीआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र आहे. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात प्रवेश केला. त्यांनी ग्रेनेडस् फेकत बेछुट गोळीबाराला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेली चकमक अजूनही सुरू आहे. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हा मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने येथील लेथीपोराच्या परिसरात २.१० च्या सुमारास प्रवेश केला. जम्मू-काश्मीर कमांडो प्रशिक्षण तळाच्या बाजूला तैनात असणाऱ्या भारतीय जवानांच्या लक्षात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे लक्षात आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दहशतवाद्यांनी सुरूवातीलाच अचानकपणे ग्रेनेड हल्ला आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केल्याने लष्कराचे काही जवान जखमी झाले होते. सकाळी या जखमींपैकी एका जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही ही चकमक सुरूच होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची संख्या चारवर गेली आहे. तर आतापर्यंत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मात्र, अजूनही काही दहशतवादी येथील रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले आहेत. त्यामुळे ही चकमक आणखी काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे.

 

काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. येथून भारतीय जवानांनी पाकच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केला व त्याठिकाणी गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. हे सैनिक ‘५९ बलूच रेजिमेंट’चे होते. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कारचे हे पहिलेच क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन होते. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.