अल्पकालीन नियुक्तीवरील महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी नियुक्तीसाठी लष्कराने निश्चित केलेले मूल्यमापनाचे निकष भेदभावजनक आहेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी लष्करावर ताशेरे ओढले. या व्यवस्थात्मक भेदभावामुळे महिला अधिकाऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असून, त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का बसत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेताना अनेक त्रुटींवर बोट ठेवले. लष्करात स्थायी नियुक्तीसाठी वार्षिक गोपनीय अहवाल मूल्यमापनासाठी लष्कराने निर्धारित केलेले निकष हे या महिला अधिकाऱ्यांविरोधातील व्यवस्थात्मक भेदभाव ठरत आहेत. महिला अधिकाऱ्यांची कामगिरी आणि यश मूल्यमापनात दुर्लक्षित करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करताना लष्कराकडून होणाऱ्या चुकांकडे लक्ष वेधत ८६ महिला अधिकाऱ्यांनी याचिका केल्या आहेत. त्यावर न्यायालयाने १३७ पानी निकाल दिला. राज्यघटनेला वरवरची समानता अभिप्रेत नसून, तसे झाल्यास स्त्री-पुरुष समानता केवळ प्रतिकात्मक ठरते, असे न्यायालयाने नमूद केले.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडीत (६० टक्के) निर्धारित श्रेणी मिळवलेल्या सर्व महिला अधिकारी वैद्यकीय निकष पूर्ततेनंतर स्थायी नियुक्तीस पात्र असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. १ ऑगस्ट २०२० रोजीच्या सर्वसाधारण सूचनांमध्ये उल्लेख असलेले वैद्यकीय निकष हे लष्करातील सेवेच्या पाचव्या वर्षी किंवा नवव्या वर्षी लागू असावेत. मात्र, अल्पकालीन नियुक्तीवर असलेल्या महिला अधिकारी या निश्चित कालावधीवेळी वैद्यकीय निकषांची पूर्तता करण्यास असमर्थ असतील तर त्या स्थायी नियुक्तीस पात्र ठरणार नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाचे फटकारे…

* आपली समाजरचना ही पुरुषांसाठी पुरुषांनी तयार केलेली व्यवस्था असून, समताधिष्ठित समाजबांधणीसाठी त्यात बदल करणे आवश्यक आहे.

* अल्पकालीन नियुक्तीवरील महिला अधिकाऱ्यांच्या कार्यमूल्यमापनाच्या निकषांतील त्रुटी या त्यांच्या आत्मसन्मानाला धक्कादायक आहेत.

*  महिला अधिकाऱ्यांना देशाच्या लष्करात सेवा बजावण्यास परवानगी असल्याबद्दल अभिमान बाळगणे इतकेच पुरेसे नाही. लष्करातील या महिलांना सामोरे जावे लागत असलेली परिस्थिती वेगळे चित्र दर्शवते.

* राज्यघटनेला वरवरची समानता अभिप्रेत नाही. अशी समानता केवळ प्रतीकात्मक ठरेल.