देशाच्या प्रत्येक संस्थेवर, यंत्रणेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कब्जा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातही संघाने त्यांची माणसे पेरली आहेत. एवढेच नाही तर सरकारचे निर्णय भाजपातर्फे नाही तर सरकारतर्फे घेतले जात आहेत असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर निशाणा साधला. कर्नाटकातल्या कलबुर्गी या ठिकाणी राहुल गांधी प्रचारासाठी आले होते त्यावेळी त्यांनी ही घणाघाती टीका केली.

नोटाबंदीचा निर्णय देशात घेण्यात आला. या निर्णयामागे कोण होते तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला वाटेल की केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली किंवा आरबीआयने हा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडला असेल. मात्र तसे नाही. नोटाबंदीसंदर्भातला विचार संघ विचारसरणीच्या एका तज्ज्ञाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून एखादा विचार किंवा कल्पना मांडली जाते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याची अंमलबजावणी करतात. त्यामुळे या सरकारच्या निर्णयामागे संघ आहे हे उघड आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर भाजपाचे काम चालते. मात्र भाजपा आणि संघ मिळून देशाला अधोगतीकडे नेणारे निर्णय घेत आहेत. भारताच्या प्रत्येक मंत्रालयात संघाचा किमान एक माणूस जाणीवपूर्वक पेरण्यात आला आहे. हा माणूस आणि त्या खात्याचा मंत्री मिळून काम करतात. मंत्र्यांना त्यांच्या मनाने निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आरएसएस सांगेल तसे त्यांना वागावे लागते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संघाला हुकुमशाही राबवायची आहे सामाजिक संस्था यांना नकोत, अशी कोणती संस्था असेल की त्यावर कब्जा करण्याचे काम हे लोक बेमालुमपणे करतात. जनहिताचे निर्णय घेण्याच्या विरोधात संघ आणि भाजपा आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. सामाजिक संस्थांवर लोकांचे नियंत्रण असले पाहिजे हेच काँग्रेसचेही धोरण आहे. पण भाजपाला आणि संघाला ते मान्य नाही. त्याचमुळे आमचे म्हणणे त्यांना कधीही पटत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.