दिल्लीत करोनामुळे भयावह परिस्थिती असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोविड सेंटरमध्ये उचारासाठी दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलीवर एका रुग्णाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ करण्यात आल्याचंही समोर आलं असून, पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एका अल्पवयीन मुलीला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिला कोविंड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. तर आरोपी तरुणही करोनाचं निदान झाल्यानंतर त्याच काळात सेंटरमध्ये दाखल झाले होते. १५ जुलैच्या रात्री आरोपीने बाथरूममध्ये मुलीवर अत्याचार केला. मुलीने आणखी एका १९ वर्षाच्या मुलावर या अत्याचाराचा व्हिडीओ बनवल्याचा आरोप केला आहे.

या कोविड केंद्राचं व्यवस्थापन इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांकडे असून, त्यांनी या घटनेची दिल्ली पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त याविषयी बोलताना म्हणाले की,”या घटनेतील दोन्ही आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार व भादंवि ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून, करोनातून बरे होईपर्यंत ते देखरेखीखाली राहणार आहे.”

सध्या दोन्ही आरोपींना एम्समध्ये ठेवण्यात आलं आहे. करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आरोपींना तुरूंगात पाठवण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. कोविड केंद्राच्या एका सदस्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, मुलगी मध्यरात्री बाथरूमला गेली होती. याच दरम्यान आरोपीही गेले असावे. पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह आहेत. या प्रकरणाची आम्ही माहिती घेत आहोत. तूर्तास मुलीला याच कोविड केंद्रात ठेवण्यात येणार आहे.”