चाळीस आमदारांच्या मिझोराम विधानसभेसाठी येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांकरिता काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या विद्यमान ३२ आमदारांपैकी ३० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व मतदारसंघांत स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे.
मिझोरामचे विद्यमान मुख्यमंत्री लाल ठाणावाला यांनी सरच्चिप आणि ऱ्हँगटुझरे या दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मिझोरामचे माजी महसूलमंत्री जे. एच. रोठुआमा आणि माजी मंत्री निरुपम चकमा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
दरम्यान, मिझोराममधील प्रमुख विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट, एमपीसी आणि मारालँड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षांनीही एकत्रितपणे १२ उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात येईल.