‘मॉडर्ना’चा दावा; आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी?

न्यू यॉर्क : आपण विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस परिणामकारक असल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना औषधनिर्मिती कंपनीने केला असून ही कंपनी लवकरच लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी अमेरिका आणि युरोपीय संघाच्या नियामकांकडे मागणार आहे.

आपण विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस ९४.१ टक्के परिणामकारक असल्याचे आणि लशीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम उद्भवले नसल्याचे मॉडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले. ‘मॉडर्ना’ने अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट्स ऑफ हेल्थच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांमध्ये ही लस ९४.५ टक्के परिणामकारक ठरली होती.

कंपनीने ३० हजारहून अधिक लोकांवर लशीची चाचणी केली. त्यापैकी १९६ जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यांत १८५ जण लशीची बनावट मात्रा दिलेले, तर ११ जण लशीची अस्सल मात्रा दिलेले होते. लशीची बनावट मात्रा न दिलेल्या ३० जणांमध्ये करोनाची गंभीर लक्षणे आढळली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती ‘मॉडर्ना’चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टाल झ्ॉक्स यांनी दिली.  लशीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेची माहिती मॉडर्ना कंपनीने जाहीर केली आहे. या लशीची मात्रा घेतलेल्या स्वयंसेवकांमध्ये फ्लूची तात्पुरती लक्षणे आढळली. याचा अर्थ अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी घालून दिलेल्या निकषांची पूर्तता झाली आहे, असे ‘मॉडर्ना’ने स्पष्ट केले.

या लशीच्या परिणामकारकतेची चाचणी करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले होते, परंतु कंपनीने लस ९४ टक्क्य़ांहून अधिक परिणामकारक असल्याचे सोमवारी जाहीर केले आणि लवकरच तिच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकी औषध निर्मिती कंपनी फायझर आणि बायोएनटेक ही तिची जर्मन भागीदार कंपनी अमेरिकेत डिसेंबरमध्ये लसीकरण सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे, तर ब्रिटिश नियामक फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या लशींच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करत आहे.

निष्कर्ष असे  :  कंपनीने ३० हजारहून अधिक लोकांवर लशीची चाचणी केली. त्यापैकी १९६ जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाला. या १९६ जणांपैकी १८५ लशीची बनावट मात्रा दिलेले, तर ११ जण लशीची अस्सल मात्रा दिलेले होते. लशीची बनावट मात्रा दिलेल्या ३० जणांमध्ये करोनाची गंभीर लक्षणे आढळली.