मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान ३० प्रचार सभांचा धडाका लावूनही पराभव पदरी पडल्यानंतर भाजपमध्ये लाथाळ्या सुरू होणे स्वाभाविक असल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी व्यक्त केली.
न्यूटनच्या गतीचा नियम भाजपला लागू आहे. प्रत्येक क्रियेनंतर प्रतिक्रिया अपेक्षितच असते, असे नितीशकुमार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण रोवणाऱ्या ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांच्या विधानांवर नितीश यांनी आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले, बिहार निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असे अनेक जण छातीठोकपणे सांगत होते. त्यासाठी अमित शहा यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचे नेते बिहारमध्ये सभेसाठी आले. त्यामुळे जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर पक्षात उमटलेली प्रतिक्रियाही तितकीच जोरदारपणे येणे नैसर्गिक आहे.
राज्यपाल रामनाथ कोविंद यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नितीशकुमार राजभवनात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
अडवानी आणि जोशी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या साथीने भाजप पक्षाची स्थापना केली आणि त्याला नवे सामथ्र्य प्राप्त करून दिले. त्यामुळे अशा मातब्बरांकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा होणारा ऱ्हास पाहवला गेला नसेल आणि ज्येष्ठ नेते भाजपमधील स्थितीविषयी आपली मते व्यक्त करतात तेव्हा त्याकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागते, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात अडवानी यांच्याशी आपले सौहार्दाचे संबंध होते. अडवानी यांचा वाढदिवस ८ नोव्हेंबरला झाला. त्या वेळी मीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमधील भाजपच्या पराभवाची चिकित्सा नव्याने करण्यात यावी आणि जबाबदार नेत्यांना त्यांची जागा दाखवावी, अशी मागणी करणारे संयुक्त निवेदन शत्रुघ्न सिन्हा, आर. के. सिंह, हुकूमदेव नारायण यादव आणि भोला सिंह या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मंगळवारी दिले होते. यात चारही नेत्यांनी बिहार भाजपमधील कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली होती.