नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील ४६ महिन्यात जाहिरातींवर तब्बल ४३४३.२६ कोटी रूपये खर्च केले आहेत. मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका झाल्यानंतर यंदाच्या वर्षी यावर २५ टक्के कमी खर्च करण्यात आला आहे. २०१६-१७ मध्ये मोदी सरकारने एकूण १२६३.१५ कोटी रूपये जाहिरातीवर खर्च केले होते. माहिती अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत विविध जाहिरातींवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन विभागाचे आर्थिक सल्लागार तपन सूत्रधर यांनी १ जून २०१४ ते आतापर्यंत देण्यात आलेल्या जाहिरातींची माहिती दिली. यामध्ये १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान ४२४.८५ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ४४८.९७ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि ७९.७२ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहे. यापूर्वी हा खर्च यापेक्षा जास्त होता.

वर्ष २०१५-२०१६ आर्थिक वर्षांत ५१०.६९ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ५४१.९९ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि ११८.४३ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले. वर्ष २०१६-१७ मध्ये ४६३.३८ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ६१३.७८ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि १८५.९९ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आला.

मागील वर्षींच्या आकडेवारीनुसार यंदा जाहिरातींवरील खर्च थोडा कमी झाल्याचे दिसते. १ एप्रिल २०१७ ते ७ डिसेंबर २०१७ दरम्यान ३३३.२३ कोटी रूपये मुद्रित माध्यम. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ४७५.१३ कोटी रूपये तर बाह्य खर्चावर १४७.१० कोटी रूपये खर्च करण्यात आला. हा १ एप्रिल २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचा खर्च आहे. मोदी सरकारने २०१७-१८ मध्ये या खर्चांत कपात केल्याचे दिसून येते. वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण १२६३.१५ कोटी रूपये खर्च करणाऱ्या सरकारने वर्ष २०१७-२०१८ मध्ये ९६६.४६ कोटी रूपये खर्च केले आहेत. मोदी सरकारने २५ टक्के म्हणजे ३०८ रूपये खर्चांत कपात केली आहे.