जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे वादग्रस्त अनुच्छेद ३७० रद्द करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळात मांडला. त्यानंतर चर्चेदरम्यान गोयल यांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत, असे म्हणत भाजपाचे खासदार विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले. कलम ३७० हटवल्यानंतर सभागृहात चर्चेदरम्यान विजय गोयल बोलत होते. यावेळी गोयल यांनी मोदी आणि केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं.

विजय गोयल यांनी चर्चेदरम्यान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोदींची लढाई निरंतर आहे.’ कलम ३७० हटवणं हा एक धाडसी निर्णय आहे. या निर्णयामुळे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्याम प्रसाद मुखर्जी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिल्याचेही गोयल म्हणाले.

दरम्यान, अनुच्छेद ३७० संपुष्टात आणण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारा प्रस्ताव ३५१ विरुद्ध ७२ मतांनी मंगळवारी मंजूर करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा काश्मीरविषयक प्रस्ताव मांडण्यासाठी उभे राहताच विरोधकांच्या संतापाला सुरुवात झाली. शहांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबरच जम्मू-काशीर राज्याची फेररचना करणारे विधेयक तसेच, जम्मू-काश्मीरला १० टक्के आरक्षण लागू करण्याचे विधेयकही मांडले. मात्र विरोधक शहा याचे म्हणणे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘अनुच्छेद ३७० ऐतिहासिक असून त्यामुळे जम्मू-काश्मीर भारताशी जोडले गेले आहे,’ असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणताच, शहा यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. ‘संसदेत आज (सोमवार) घेतला जाणारा निर्णयही ऐतिहासिक आहे. पं. नेहरू यांनी केलेली चूक सुधारली जात आहे,’ असा युक्तिवाद शहा यांनी केला. शहा यांच्या या विधानामुळे विरोधी पक्ष सदस्यांमध्ये संतापाची लाट उसळली.