पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यात बुधारी संरक्षण आणि व्यापारातील सहकार्यासह व्यापक द्विपक्षीय तसेच परस्पर हिताच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. दहशतवादाचा सामना करण्याचे उपाय आणि भारत- पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले ठेवण्याच्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.

येथे झालेल्या पूर्व आशिया परिषदेच्या (ईस्ट एशिया समिट) निमित्ताने दोन्ही नेत्यांची सौहार्दपूर्ण भेट झाली. प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांबाबत वाढत्या सहकार्यावर आधारित महत्त्वपूर्ण भागीदारीच्या सर्व मुद्दय़ांवर दोघांचीही उपयुक्त चर्चा झाली, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला २६ नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा संदर्भ देऊन पेन्स यांनी दहशतवादाला तोंड देण्याबाबत दोन्ही देशांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला, असे परराष्ट्र  सचिव विजय गोखले यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.मोदी यांनी पेन्स यांचे आभार मानतानाच, जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे मूळ आणि त्यांचे उगमाचे ठिकाण एकच असल्याची कुठल्याही देशाचे किंवा संघटनेचे नाव न घेता आठवण करून दिली.

व्यापाराशी संबंधित द्विपक्षीय मुद्दय़ांवरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या दोन वर्षांत अमेरिकेची भारतातील आयात ५० टक्क्यांनी वाढली आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला.