पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दोन्ही देशांचं नातं मजबुतीनं पुढे जात असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

या निवेदनानुसार, मोदींनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली तसेच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्रम्प, त्यांचे कुटुंब आणि अमेरिकेच्या लोकांना नव्या वर्षात चांगले आरोग्य, समृद्धी आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पीएमओने सांगितले की, दोन्ही देशांचं नातं मजबुतीने पुढे जात असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तसेच त्यांनी गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील रणनीती सहकार्य अधिक व्यापक व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत काम सुरु ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील भारतीयांना नव्या वर्षात समृद्धी आणि प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी गेल्या काही वर्षात परस्पर संबंधांवर समाधान व्यक्त केलं आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आपण तत्पर असल्याचं सांगितलं.