पंतप्रधान मोदींची ग्वाही; विरोधकांकडून केवळ अपप्रचार; दिल्लीत डॉ. आंबेडकर स्मारकाची पायाभरणी

विरोधक सरकारबाबत अपप्रचार करत असून, मी बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त आहे. दलित व आदिवासींसाठी आरक्षणाचे धोरण जरी आंबेडकर पुन्हा अवतरले आणि त्यांनी ते धोरण रद्द करण्याची मागणी केली तरी शक्य नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विज्ञान भवन येथे आंबेडकर स्मृती व्याख्यानात त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. काही जणांना आम्हाला पाहिजे तरी जळफळाट होतो. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यावर ते अफवा पसरवत आहे अशी टीका मोदींनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दिल्लीत उभारले जात असून त्याचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मोदी म्हणाले, की वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा विरोधकांनी आरक्षण जाणार अशी भीती पसरवली, पण ते दोनदा पंतप्रधान झाले तरी तसे काही घडले नाही. आताही विरोधक तसा अपप्रचार करीत असले, तरी दलितांचे आरक्षण कायम राहणार आहे. दलित, आदिवासी व वंचित समुदायाचा आरक्षण हा अधिकार आहे व तो हिरावून घेतला जाणार नाही किंवा तसे कोणी करू शकत नाही. आम्ही जेथे सत्तेत आहोत, तेथे असे झालेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकर हे मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांच्याइतकेच जागतिक दर्जाचे नेते होते. ते केवळ दलितांचे नेते होते असे भासवून आपण त्यांच्यावर अन्याय करीत आहोत. त्यांनी समाजातील कुणावरही होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मर्यादित करून चालणार नाही.

भव्य स्मारकाची उभारणी

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकात आंबेडकरांच्या वस्तू, त्यांचे जीवन व कार्य या सर्वाचा समावेश केला जाईल. सरकार जनपथावर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारत आहे. त्याची पायाभरणी गेल्या मे महिन्यात झाली आहे. आंबेडकरांच्या स्मृतिव्याख्यानासाठी येणारा मी पहिला पंतप्रधान आहे. माझे ते मोठे भाग्य आहे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे.