कर्नाटकची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरु असलेली पक्षीय लढाई हळूहळू व्यक्तिगत स्वरुपाची होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव न घेता गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना काँग्रेस नेत्यांनी मर्यादा ओलांडू नये अन्यथा त्यांना किंमत मोजावी लागेल असा इशारा रविवारी संध्याकाळी हुबळी येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दिला.

मोदींनी इतकी आक्रमक भाषा वापरताना कोणाचेही नाव घेतले नाही. पण काँग्रेस माँ आणि त्यांचा मुलगा असा उल्लेख केला. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकातील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले करत आहेत. कदाचित त्यामुळेच मोदींनी इतकी आक्रमक भाषा केली असावी.

भारतीय बँकांचे पैसे बुडवून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला राहुल गांधी छोटा मोदी बोलतात तसेच भाजपा नेत्यांना ते गब्बर सिंग गँग म्हणून संबोधतात. काँग्रेस नेत्यांना तथ्यहीन, खोटे आरोप करण्याचा कंटाळा येत नाही का ? असा सवाल मोदींनी हुबळीच्या सभेत विचारला. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मर्यादा ओलांडता, मला तसे करायचे नाही. पण एक प्रश्न विचारायचा आहे. काँग्रेस माँ आणि त्यांचा मुलगा जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्याविरोधात एफआयआर का दाखल करावा लागला ? आई आणि मुलाविरोधात काय आरोप आहेत ? असे सवाल मोदींनी केले.