पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसमावेशक विचारसणीकडे वाटचाल करायची असल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल असं मत इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य करताना गुहा यांनी मोदींच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडून सांगितले. यामध्ये मोदींना स्वत:ला सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय घ्यायला आवडतं, आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असं मोदींना वाटतं असं निरिक्षण मोदींच्या स्वभावासंदर्भात बोलताना गुहा यांनी नोंदवलं आहे. प्रसिद्ध पत्रकार करण थापा यांना ‘द वायर’साठी दिलेल्या मुलाखतीच्या शेवटी मोदींचा स्वभाव बदलेलं का यासंदर्भात भाष्य करताना गुहा यांनी मोदींना उद्धव यांचा आदर्श घ्यावा लागेल असं म्हटलं आहे.

सध्या देशात उद्भवलेल्या करोनाच्या गंभीर समस्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचं सांगताना गुहा यांनी या मुलाखतीमध्ये मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य केलं आहे. मोदींना तज्ज्ञांची आवश्यकता वाटत नाही असं तेच म्हणाल्याचा संदर्भ देताना गुहा यांनी मोदींना शिक्षणाचं फारसं महत्व वाटत नसल्याची टीका केलीय. “मला तज्ज्ञांची गरज नाही असं मोदींच म्हणाले होते. आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळंत असं मोदींना वाटतं. ते फक्त अशाच तज्ज्ञांचा सल्ला घेतात जे त्यांना अपेक्षित उत्तर देतात,” असंही गुहा यांनी मुलाखतीमध्ये मोदींच्या सल्लागारांबद्दल बोलताना म्हटलं आहे. पुढेच याच गोष्टींचा संबंध गुहा यांनी करोना परिस्थितीशी जोडला आहे. करोना परिस्थिती हाताळताना मोदींनी तज्ज्ञांना प्राधान्य देण्याऐवजी नाट्यमय धोरणं आखण्यासाला प्राधान्य दिल्याचं गुहा म्हणाले आहेत.

“देशात सध्या उद्भवलेली करोना परिस्थिती आता इतकी गंभीर नसती तर पंतप्रधांनी त्यांची धोरणं भारतातील उत्तम साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तयार केली असती. सध्याची मोदींची धोरणं ही नाट्यमय आणि नेत्रदीप ठेवण्यास प्राधान्य दिलं जातंय,” असंही गुहा यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. थाळ्या वाजवणं, दिवे लागवणं, घरातील लाईट्स नऊ मिनिटांसाठी बंद करणं हे सारे प्रकार म्हणजे लोकप्रियता आणि अंधश्रद्धा असल्याचंही गुहा यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

उद्धव बाळासाहेबांपेक्षा वेगळे…

मोदींच्या स्वभावाबद्दल बोलून झाल्यानंतर मुलाखतीच्या शेवटी मोदी बदलतील का यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता गुहा यांनी उद्धव ठाकरेंचं उदाहरण दिलं. “मोदी बदलतील का? ते इतर लोकांवर अधिक विश्वास ठेवतील का?, लोकांना श्रेय देतील का? असे अनेक प्रश्न आहेत. पण व्यक्ती कालानुरुप बदलू शकतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. फॅसिस्ट विचारसणीत वाढलेले उद्धव अधिक मनमोकळ्यापणे विचार करणारे आहेत. एखाद्या व्यक्तीला पंथाचा दर्जा मिळतो असा वातावरणामध्ये एका मोठ्या व्यक्तीसोबत उद्धव ठाकरेंनी आयुष्यातील बराच काळ घालवला. पण उद्धव ठाकरे आता बदलले असून वडिलांच्या विचारसणीप्रमाणे न चालता ते राजकीय मार्गावर समतोल राखत चालण्याचा आणि मुख्य प्रवाहातील राजकारणाचा विचार करताना दिसत आहेत. त्यांनी निश्चय करुन आणि यशस्वीपणे हा बदल घडवून आणला आहे. तसाच बदल मोदींना स्वत:मध्ये करुन घ्यावा लागेल,” असं गुहा म्हणाले आहेत. गांधींच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्येही बदल झाल्याचं पहायला मिळाल्याचा संदर्भ गुहा यांनी मुलाखतीमध्ये दिला.