पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली सहा वर्षे देशाची दिशाभूल केली. तरुण आणि शेतकरीवर्गाला दिलेले एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. ते पूर्णत: अपयशी ठरले आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी केली.

काँग्रेसने रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ सभेत मनमोहन सिंग बोलत होते. गडगडलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक अशांतता, नागरिकत्व दुरुस्ती अशा विविध विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने राजधानीत जाहीर सभा घेतली.  देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर इतकी होईल, पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तरुणांसाठी दोन कोटी रोजगारनिर्मिती केली जाईल अशी मोठमोठी आश्वासने मोदींनी दिली होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंताजनक अवस्था पाहता यातील एकही आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे मनमोहन म्हणाले.

देशाला पर्यायी धोरणांची आणि सरकारची गरज असून त्यासाठी लोकांनी काँग्रेसचे हात बळकट केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकरी, व्यापारी देशोधडीला – सोनिया गांधी</strong>

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. तरुणांना रोजगारासाठी वणवण करावी लागत आहे. अन्नदाता शेतकरी नाडला गेला आहे. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट बनली आहे. बँकांची कर्जे घेतलेले छोटे-मध्यम व्यापारी देशोधडीला लागले आहेत. हे सगळे मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे दुष्परिणाम असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. सध्या देशाची अवस्था अंधेरी नगरी चौपट राजा अशी झाली आहे. अर्थव्यवस्था का गडगडली? रोजगार का गायब झाले?

काळा पैसा शोधण्यासाठी निश्चलनीकरण केल्याचा दावा केला गेला मग, काळा पैसा सापडला का? जीएसटी लागू करूनही सरकारची तिजोरी रिकामी का झाली, याची चौकशी करायला नको का, अशा प्रश्नांची सरबत्ती सोनिया गांधी यांनी केली.

‘राहुल गांधी नव्हे राहुल जिना’

राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने भाजपने पुन्हा त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांना ‘राहुल जिना’ हेच नाव योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नरसिंह राव यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे राजकारण बघता राहुल गांधी हे महमद अली जिना यांचेच वारसदार ठरतात, सावरकरांचे नव्हे, असे नरसिंह राव म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊ त यांनीही नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा आपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,’ असे ट्वीट संजय राऊ त यांनी केले.

रामलीला खचाखच

काँग्रेसने अनेक महिन्यांनी दिल्लीत जाहीर सभा आयोजित केली होती. रामलीला मैदान खचाखच भरले होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता, पण त्याला फारसे यश आले नाही. शनिवारच्या सभेसाठी हिंदी पट्टय़ातील तीन राज्ये, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांमधूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते. व्यासपीठावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही उपस्थित होते. याशिवाय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, पी. चिदम्बरम, आनंद शर्मा, भूपिंदर हुडा हे नेतेही उपस्थित होते. शिवाय पक्षात नाराज असलेले ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्यासारखे तरुण नेतेही व्यासपीठावर होते.

मी सावरकर नव्हे – राहुल गांधी

माझे नाव राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. सत्य सांगितल्याबद्दल मी वा काँग्रेसमधील कोणीही माफी मागणार नाही. अर्थव्यवस्थेची दुरवस्था केल्याबद्दल मोदी आणि शहा यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. झारखंडमधील प्रचारसभेत ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी करत केंद्रातील भाजप सरकारविरोधात राहुल यांनी झोड उठवली होती. परंतु राहुल यांच्या विधानावरून शुक्रवारी लोकसभेत रणकंदन झाले. राहुल यांनी त्यांच्या टिप्पणीबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, संसदेत शुक्रवारी भाजपने मला माफी मागायला सांगितली होती. मी सत्य सांगितल्याबद्दल ते मला माफी मागायला सांगत आहेत, पण मी ते कधीही करणार नाही!