देशभरातील नागरिकांवर यंदा वरुणराजाची कृपादृष्टी राहणार आहे. येणारा पावसाळा हा संपूर्ण देशात सरासरी इतका असेल, असा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. यावर्षी देशात दुष्काळाची स्थिती नाही, असेही स्कायमेटने म्हटले आहे.

मान्सून म्हणजे देशातील कृषिप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा असतो. भारतात आपल्याला पाऊस जून ते सप्टेंबरच्या काळात नैऋत्य मौसमी वाऱ्यांमुळे मिळतो. भारतातले बहुतांशी शेती, उद्योगधंदे, विकास आणि आर्थिक व्यवस्था पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे दरवर्षी भारतात मान्सूनची स्थिती कशी असेल, याकडे देशभराचे लक्ष लागलेले असते.

बुधवारी स्कायमेट या संस्थेने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असे स्कायमेटने सांगितले. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

https://twitter.com/Mpalawat/status/981380257352749056

काय आहे अंदाज?

> ५% शक्यता जास्त पावसाची (हंगामी पाऊस ११०% पेक्षा जास्त आहे)
> २०% शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची (हंगामी पर्जन्य १०५% ते ११०% च्या दरम्यान)
> ५५% शक्यता सर्वसाधारण पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्यमान ९६ ते १०४% च्या दरम्यान)
> २०% शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्य ९०% ते ९५% च्या दरम्यान)
> ०% शक्यता दुष्काळ होण्याची (हंगामी पाऊस ९०% पेक्षा कमी)